भाई गणपतराव देशमुख : जगावेगळा राजकारणी.

 भाई गणपतराव देशमुख : जगावेगळा राजकारणी.



हल्ली नगरसेवक किंवा सरपंचपद मिळाल्यानंतर लगेच व्यक्तीकडे स्कॉर्पिओ, थार किंवा तत्सम गाडी आलेली असते. आमदार म्हणल्यावर त्याच्या ताफ्यात तीन-चार फॉर्चुनर, रेंजरोव्हर किंवा चार बांगडी म्हणजे ऑडी गाडी असल्याच पाहिजेत. मात्र एक असा आमदार होता, जो स्वतःची गाडी न वापरता रेल्वे आणि एसटीनं फिरायचा. बरं तो काही पहिल्यांदा आमदार झाला नव्हता, त्याने तब्बल अकरावेळा आमदार होऊन, चोपन्न वर्ष विधानसभेमध्ये जनतेची गाऱ्हाणी मांडली होती. एवढ्या प्रस्तावनामध्येच महाराष्ट्रातील लोकांना लक्षात आलं असेल की मी भाई गणपतराव देशमुख उर्फ आबांच्याबद्दल बोलत आहे. आबा त्यांच्या तत्वाचे खूपच पक्के होते. सरकारी निवासामध्ये येणारी वर्तमानपत्रं सरकारी खर्चाने येत असतं, त्यामुळे त्यांच्या रद्दीवर सरकारचा अधिकार आहे असं म्हणत आबा रद्दीचे पैसे सामान्य प्रशासन विभागामध्ये जमा करायचे. पुलोद सरकारमध्ये ते मंत्री होते तेव्हाची गोष्ट, जेव्हा त्यांना समजलं की आपलं सरकार पडलं आहे, दुसऱ्याच क्षणी त्यांनी आपली लाल दिव्याची गाडी आणि आपले सुरक्षारक्षक शासनाला परत केले होते. आबा जगावेगळे राजकारणी होते. 


सोलापूरमधील मोहोळ तालुक्यामध्ये असलेल्या पिंपरी या गावी ५ ऑगस्ट १९२७ रोजी एका शेतकरी कुटुंबामध्ये आबांचा जन्म झाला. त्यांचं मूळगाव मोहोळ तालुक्यातील पेनुर होतं. त्यांचे वडील, अण्णासाहेब हे शेती करायचे. त्यांची आणि त्यांच्या भावाची मिळून चोवीस एकर जिरायती जमीन होती. आबांचं पाचवी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण गावातल्या शाळेतच झालं. सहावी आणि सातवीसाठी त्यांना सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटकुल गावातल्या शाळेमध्ये जावं लागलं. रोज बारा किलोमीटरची पायपीट करावी लागायची, मात्र मित्रांच्या संगतीनं अंतर कधी संपायचं कळायचं नाही. सातवीनंतरच्या माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना पंढरपूर गाठावं लागलं. घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यानं गावातच राहून शेती करावी अशी आईवडिलांची इच्छा होती. मात्र आबांना शिकायचं होतं. माध्यमिक शाळेत शिकत असतानाच आबा काँग्रेसचे प्राथमिक सदस्य झाले आणि पक्षासाठी जमेल ती कामं करू लागले. 


आबा सांगतात की त्यांचा विद्यार्थीदशेचा काळ खूप भारलेला होता, चलेजाव आंदोलन आणि पत्री सरकारमुळे सगळीकडे ऊर्जेचं वातावरण होतं. या वातावरणामध्ये इंग्रजांचे राज्य जाऊन आता जनतेचं राज्य लवकरच येणार आहे असा आशावाद भरलेला होता. लोक देशासाठी स्वतःच्या कुटुंबाची राखरांगोळी करत हसतहसत जेलमध्ये जात होते. पेनुर गावामध्ये तुळशीदास जाधव या क्रांतिवीराचा मोठा प्रभाव होता. ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत म्हणूनच आबा देखील विद्यार्थीदशेमध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाले. नंतर जाधव शेतकरी कामगार पक्षात गेल्यानंतर आबा आणि पूर्ण गाव शेकापचं झालं. पुण्यातील एस पी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आबांनी फीवाढी विरोधात आंदोलन केलं होतं. गोविंदराव बुरगुटे, एस एस पाटील, डॉ आप्पासाहेब पवार (शरद पवार यांचे मोठे बंधू) हे त्यांचे मित्र आंदोलनामधील त्यांचे सोबती होते. आप्पासाहेब हे त्यांचे रूममेट देखील होते.  


पुण्यात शिकत असताना आबांना मार्क्सवादाची ओळख झाली. शंकरराव मोरे, वसंतराव तुळपुळे आणि कमलाबाई भागवत यांच्या मार्गदर्शनाखालील मार्क्सवादाचे धडे गिरवण्यासाठी ते नियमितपणे अभ्यासवर्गाला हजर राहू लागले. शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांची साम्यवादी वैचारिक बैठक तयार झाली होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नंतर त्यांनी पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमध्ये वकिलीची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी मोहोळ शहरामध्ये वकिली सुरू देखील केली. वकिलीच्या कामासाठी त्यांच्या चुलत्याने त्यांना सांगोला भागामध्ये बोलावलं, जो भाग पुढे त्यांची कर्मभूमी झाला. त्यांचे चुलते यशवंतराव देशमुख हे सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावामध्ये स्थायिक झाले होते, जिथे पुनर्वसनाचा प्रश्न उभा झाला होता…


१८९० च्या दुष्काळात सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ गावात इंग्रजांनी तलाव बांधण्याचा उपक्रम हाती घेतला होता. पण हे काम पूर्ण होण्यासाठी ६० पेक्षा जास्त वर्षं लागली. १९५६ मध्ये या तलावाचं काम पूर्ण झालं. या तलावनिर्मितीमध्ये सोळाशे एकर जमीन गेली होती आणि दीडशे कुटुंबांना आपलं घर सोडून विस्थापित व्हावं लागलं होतं. या दीडशे कुटुंबांना त्यांचा पुनर्वसनाचा हक्क मिळावा यासाठी आबांनी संघर्ष समिती स्थापन केली आणि न्यायालयीन लढा उभारला. हा लढा यशस्वी झाला आणि सर्व कुटुंबीयांना योग्य मोबदला मिळाला. या लढ्यामुळे शेतकरी कामगार पक्ष या भागांमध्ये पसरला आणि भाई गणपतराव देशमुख हे त्यातील एक मोठं नाव झालं. आबांचा पिंड हा कार्यकर्त्याचा होता, राजकारण्यांचा नाही. समाजाचे भलं कसं करता येईल, सामाजिक परिवर्तन कसे घडेल यासाठी ते काम करत होते, भविष्यात त्याचा राजकीय फायदा होईल आणि आपल्याला आमदारकी मिळेल असं त्यांना स्वप्नदेखील पडलं नव्हतं. 


मात्र १९६२ च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं त्यांना तिकीट देण्यात आलं. अवघे सात हजार रुपये खर्च करून आबा आमदार झाले. हा पैसा देखील कार्यकर्त्यांनी उभा केलेला होता. त्या भागात दहा वर्षे काँग्रेसचे आमदार राहिलेल्या केशवराव राऊत यांचा पराभव करत गणपतराव देशमुख निवडून आले. त्यांना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की तुला जे विषय आवडतील, त्या विषयातील अधिकाधिक ज्ञान मिळवून विधानसभेत ते प्रश्न मांड. त्यामुळे चौतीस वर्षाचा हा आमदार एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे वही घेऊन विधानसभेत जायचा आणि तिथं होणाऱ्या चर्चांची टिपणं काढायचा. विधानसभेतील त्यांच्या पहिल्या भाषणाचं खुद्द मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कौतुक केलं होतं. मात्र विधानसभेत गेलेले असताना, एकदा त्यांनी घेतलेल्या केसची कोर्टात तारीख पडली आणि वकील हजर नसल्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या बाजूनं निकाल देत केस निकालात काढली. जेव्हा पक्षकार आबांपुढे रडू लागला, तेव्हा आबांनी ठरवलं की आपण एकावेळी दोन्ही गोष्टीला न्याय देऊ शकत नाही. त्या दिवसापासून त्यांनी वकिली कायमची थांबवली. 


आज आमदार खासदारांच्या निष्ठा किती स्वस्त झाल्या आहेत ना.. काही कोटींच्या बदल्यात या निष्ठा कुणाच्याही पायावर गहाण ठेवल्या जातात. आणि या सर्व क्रियेला “मतदारसंघाच्या विकासासाठी” असं नाव दिलं जातं. मात्र महाराष्ट्रामध्ये भाई गणपतराव देशमुख यांच्यासारखा जगावेगळा राजकारणी देखील जन्माला आला आहे, ज्यानं आपल्या स्वच्छ राजकारणातून शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवलं. त्यांनी जरी दोनवेळा मंत्रिपद भूषवलं असलं तरी त्यांचा पक्ष हा काही खूप मोठा पक्ष नव्हता. एका हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे आमदार शेकापचे असायचे. जी व्यक्ती एकाच मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा निवडून येते, बहुतेक वेळा ती विरोधी पक्षाच्या बाकावरच बसलेली असते असते, तिला तुमचा पक्ष सोडून आमच्या पक्षात या अशा ऑफर्स काय कमी मिळाल्या असतील का? मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद आणि राज्यपालपद देखील त्यांच्यासाठी उपलब्ध होतं. मात्र तरीही आबासाहेबांची निष्ठा कधीच ढळली नाही. पक्ष स्थापन करणारे सगळे महत्वाचे पुढारी दुसऱ्या पक्षात गेले तरी त्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडला नाही.


एकच पक्ष, एकच झेंडा आणि एकच नेता म्हणून ओळखला जाणारा सांगोला हा त्यांचा मतदारसंघ दुष्काळी भाग. शास्त्रीय भाषेत सांगायचं तर पर्जन्यछायेखाली येणारा.. मात्र आबासाहेबांनी संघर्ष आणि सहकार यांचा संगम करत इथं विकास केला. त्यांच्या तालुक्यात कापूस पिकत नसला तरी देखील इथं सूतगिरण्या अशा पद्धतीनं चालवल्या गेल्या की पूर्ण देशाला त्यांचं नवल वाटलं. कापूस हे प्रमुख पीक असलेल्या विदर्भ आणि मराठवाडा भागातील सूतगिरणी बंद पडल्या आणि सांगोला तालुक्यातील मात्र सुरू राहिल्या, आहे ना चमत्कार!! त्यांच्या सूतगिरणीमधून अर्जेंटिनासह जगभर सुत एक्सपोर्ट केलं गेलं, ज्यातून आपल्या देशाला भरपूर परकीय चलन मिळालं आहे. गुणवत्ता चांगली असल्यामुळे या सूताला जगभर मागणी होती. शून्य भ्रष्टाचार आणि शंभर टक्के पारदर्शक कारभार हे आबासाहेबांच्या कामाचं वैशिष्ट्यं. सरकार असो वा सहकार.. तिथं भ्रष्टाचार नसेल तर विकासातून अधिक विकास होत तो भूमितीय श्रेणीमध्ये वाढतो. आबासाहेबांच्या सूतगिरणीमध्ये एवढा नफा मिळायचा की त्यातून नवीन सूतगिरणी उभी राहायची. अशा एकूण तीन सूतगिरणी उभ्या राहिल्या, ज्यातील एक केवळ महिलांसाठीची होती. 


यापैकी एकाही सूतगिरणीमध्ये आबासाहेब संचालक मंडळावर नव्हते. महत्वाची पदं स्वतःला किंवा स्वतःच्या कुटुंबीयांना घेण्यापेक्षा त्यांनी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिली. संचालक मंडळाला ते मार्गदर्शन मात्र वेळोवेळी करत असत.‌ एकाही सूतगिरणीमध्ये नफ्याला पाय फुटत नसल्यामुळे भागधारकांचं आणि कामगारांचा भलं व्हायचं. कामगारांना हक्काचं घर देणाऱ्या गृहनिर्माण सोसायटी या नफ्यातून निर्माण झाल्या. कामगारांच्या मुलांचे सामुदायिक विवाह देखील या नफ्यातून व्हायचे. दुष्काळाचे वेळी या सूतगिरणीमधून चाराछावणी देखील चालवली गेली. भाई गणपतराव देशमुख यांनी शिक्षणसंस्था देखील सुरू केली. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या त्यांच्या संस्थेच्या अनेक शाखा असल्या तरीदेखील आबासाहेबांनी शिक्षणसम्राट होण्याचा प्रयत्न केला नाही. उलट शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी त्यांनी इतरांना प्रेरणा दिली. इतरांच्या शाळा महाविद्यालयांना परवानगी मिळण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. 


आपण शेतकरी आंदोलनामध्ये पाहिलं होतं की शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या दिशेनं निघाले होते. अगदी याच पद्धतीचं आंदोलन शेतकरी कामगार पक्षानं केलं होतं. शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी वारंवार प्रश्न उपस्थित करून देखील त्याची दखल विधानसभेत घेतली गेली नाही, तेव्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं १३ मार्च १९६६ रोजी लाल बावटा लावून एक लाख बैलगाड्या मुंबईमध्ये मंत्रालयात येऊन धडकल्या होत्या. गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांची मोटार शेजारून जात होती, तेव्हा एन डी पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी आपल्या बैलगाड्या तिला आडव्या घातल्या. “आज तुम्हाला मंत्रालयात जाता येणार नाही.” असं त्यांना अतिशय शांतपणे सांगण्यात आलं. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून बाळासाहेब देसाई पुन्हा आपल्या बंगल्यावर निघून गेले. या मोर्चाची दखल पूर्ण देशभर घेतली गेली होती. याशिवाय सांगोल्यात पाणीप्रश्नाबाबत जनजागृती करण्यासाठी देखील भाई गणपतराव देशमुख १०१ बैलगाड्यांचा मोर्चा काढला होता.


कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या घोषणा आपण अनेकवेळा ऐकल्या असतील, पण गणपतराव देशमुख यांनी सांगोल्याचा कॅलिफोर्निया नक्की केला. आबा दोन वेळा मंत्री झाले. ते कृषी, सहकार,पणन आणि रोजगार हमी योजना मंत्री असताना तालुक्यामध्ये फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन अनुदान मिळवून दिलं. अत्यंत कमी पाऊस असणाऱ्या भागात डाळिंब, बोर लागवडीला आवश्यक तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यांना दिलं. आज एक्सपोर्ट क्वालिटीचे डाळिंब सांगोला परिसरात पिकतं. यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड झाली. आज तालुक्यातील पंधरा हजारपेक्षा जास्त एकर जमीन फळांच्या लागवडीखाली आहे. यामुळे लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. 


१९५९ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला तालुक्यातील वाटंबरे गावात पहिली पाणी परिषद भरली होती. कृष्णा नदीचं वाहून जाणारं पाणी सांगोला तालुक्यासह इतर दुष्काळी भागाला मिळावं हा या पाणी परिषदेचा मुख्य उद्देश होता. पुढे क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, आर आर पाटील यांच्या साथीनं आबांनी दरवर्षी शाहूजयंतीला पाणी परिषद भरवून प्रश्नाचं गांभीर्य सत्ताधाऱ्यांपुढे मांडलं. नीरा कालवा तसेच टेंभू-म्हैसाळ, ताकारी, जया-कटापूर यांसारखे उपसा सिंचन प्रकल्प राबवले गेले आणि तालुक्यातील शेतीला पाणी मिळालं. तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन चंद्रभागेचं पाणी शुद्ध करून तालुक्यातील ८१ गावांना पाणीपुरवठा सुरू केला. या पाणीपुरवठा योजनेची बिलं वेळच्यावेळी गोळा करून भरली जातात. यामुळेच ही पाणीपुरवठा योजना यशस्वीरित्या चालू आहे


आबांच्या जीवनात कॉलेज जीवनापासून संघर्ष सुरू झाला, तो आयुष्यभर कायम राहिला. गोवामुक्ती चळवळ, कृषीमालाच्या भावासाठी आंदोलन, महागाईविरुद्धची चळवळ अशा अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता. आबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये तसेच आणीबाणीच्या काळात तुरुंगवास देखील भोगला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती तर्फे जादुटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी विधानसभेत १८ वर्षे संघर्ष झाला. हा कायदा व्हावा यासाठी भाई गणपतराव देशमुख सर्वात जास्त आग्रही होते. विधिमंडळात जाऊन कायदे बनवणे हे तर आमदारांचं काम असतंच, मात्र या कायद्यांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत होते की नाही हे देखील आबा स्वतः लक्ष देऊन पाहायचे. १९७३ मधील दुष्काळाच्या वेळी आपल्या मतदारसंघातील ५५ लाख लोकांना त्यांनी रोजगार हमी योजनेचं काम मिळवून दिलं होतं. दर पंधरा दिवसांनी त्यांचा पगार होईल याची दक्षता घेतली होती.


त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये लोकांना पारदर्शक कारभाराची एवढी सवय लावली होती. म्हणूनच तिथं आमदार झालेले शहाजी बापू पाटील जाहीररित्या खंत व्यक्त करत असावेत की “इथं बायकोला लुगडं घ्यायला जमत नाहीये.” होय तेच शहाजी बापू, जे गुवाहाटीमध्ये गेल्यानंतर “काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल” म्हणत मीम मटेरियल झाले होते. त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे गणपतराव देशमुख यांच्याविरुद्ध सहा वेळा निवडणूक लढवली, मात्र १९९५ चा अपवाद वगळता त्यांना एकदाही जिंकता आलं नाही. अजातशत्रू असलेल्या भाई गणपतराव देशमुख यांच्यासमोर काँग्रेस पक्ष वगळता इतर कोणी उमेदवार देखील द्यायचे नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या विरुद्ध निवडून येण्याची शक्यता खूपच कमी असायची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यासारखा ज्येष्ठ स्वच्छ चारित्र्याचा तसंच अभ्यासू आमदार विधानसभेत असावा असं सर्वांना वाटायचं. 


एसटीमध्ये आमदारांसाठी एक जागा राखीव असते, त्यावर आमदारांना राज्यभरात मोफत प्रवास करता येतो. कधीकाळी आमदार एसटीनं जात देखील असतील. मात्र माझ्या पिढीनं तरी गणपतराव देशमुख वगळता इतर कोणता आमदार किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना पाहिलेला नाही. एसटी कंडक्टरला देखील पटायचं नाही की आबा आमदार असतील! मग आबांना सिद्ध करून दाखवावं लागायचं की ते खरंच आमदार आहेत. हा आमदार अगदी वेळेच्या आधी पंधरा मिनिटं, पावणे अकरा वाजता विधानसभेत हजर असायचा. सोबत घरचा डबा आणलेला असायचा. विधानसभेचं एकही सत्र त्यांनी चुकवलं नाही. कितीही उशीर झाला तरी चर्चा सुरू असताना विधानसभा सोडली नाही. संसदेमध्ये गदारोळ होऊन कामकाज अगदी पंधरा दिवस तहकुब होत होतं, तेव्हा “ही गोष्ट जनतेच्या पैशाचा अपव्यय आहेच, पण लोकशाहीसाठी घातक देखील आहे.” असं आबा म्हणत. एका हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आबांना डेंग्यू झाला होता. त्यामुळे नागपूरच्या कडक थंडीमध्ये तुम्ही जाऊ नका असं डॉक्टरांकडून त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र आबा नागपूरला गेले होते. तेव्हादेखील त्यांनी आमदार निवासापासून विधिमंडळापर्यंत एसटीनं प्रवास केला होता. 


त्यांच्या साध्या राहणीमुळे सामान्य माणसांना त्यांच्याशी संवाद साधताना भीती वाटत नसे‌‌. विद्यार्थ्यांना तर ते आपले आजोबाच वाटतं. एकदा मोहोळ तालुक्यातील पेनुर या त्यांच्या मूळगावातील प्रेरणा गवळी नावाच्या एका मुलीनं त्यांना पत्र लिहिलं. “सकाळच्या वेळी मोहोळला जाणाऱ्या एसटी बस त्यांच्या गावांमध्ये थांबत नाही. त्यामुळे माझ्यासह इतर विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे” असं कळवलं. आबांनी लगेच मोहोळ एसटी आगारमध्ये फोन करून तक्रार केली. उद्यापासून तिथं आठ वाजता पंढरपूर मोहोळ एसटी थांबेल असं त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी प्रेरणाला कळवलं की एसटी थांबली नाही तर मला पुन्हा आठवण करशील. आणि एक दिवस चक्क स्वतः आबा गावात एसटी थांबते की नाही हे पाहायला तिथं उपस्थित होते. तुम्हाला वाचताना नवल वाटेल, पण तेव्हा त्यांचं वय एक्यान्नव वर्ष होतं. 


आबांच्या मदतीमुळे प्रेरणा गवळी तिचं मेडिकल शिक्षण पूर्ण करू शकली, डॉक्टर होऊ शकली.‌ अशी किती उदाहरणं असतील, ज्यांच्या आयुष्यात आबांचा परिसस्पर्श घडला आहे. आबा जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असत. त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये त्यांची वर्षातून किमान दोन वेळा भेट ठरलेली असायची. गावातल्या शाळेमध्ये ते थांबायचे, जिथं कुणीही ग्रामस्थ त्यांच्याशी संवाद साधू शकत असे. थेट घोंगडीवर बसून त्यांच्या बैठका चालायच्या. आबासाहेबांचा स्वभाव खूपच मधाळ होता. ते सर्वांनाच, अगदी लहान मुलांना देखील आहोजाहो बोलायचे.‌ कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता, तेव्हा सांगोला तालुक्यातील पहिल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना भेटायला ९३ वर्षाचे आबा स्वतः गेले होते.


मंत्रीपदावर असताना एकदा आबांना मधुकर भावे या पत्रकारानं विचारलं की, “तुमचा मुंबईमध्ये एवढा मोठा बंगला आहे, मग तुम्ही तुमचं कुटुंब इकडं का आणत नाही?” तेव्हा आबांनी खूप छान उत्तर दिलं होतं की, “मंत्रीपद हे काय कायमचं नसतं. आणि तसाही मुंबईचा खर्च मला परवडणार नाही. आता ते सगळे गावाला आहेत, तर मी महिना पाचशे रुपये पाठवले तरी त्यांना खूप होतात. ते मुंबईत आले तर खूप पैसा लागेल.” भावे यांनी आपल्या वर्तमानपत्रात बातमी दिली, तिचं शीर्षक होतं: “बायकोला पाचशे रुपये पाठवणारा मंत्री.” योगायोगानं जेव्हा भावे आबांच्या घरी जेवायला गेले होते, तेव्हा आबांनी ओळख करून दिली की यांनीच लेख लिहिला होता. तेव्हा आबांची पत्नी, रतनबाई म्हणाल्या, “तुम्ही खोटी बातमी दिली आहे, आबा तर घरी फक्त चारशे रुपये पाठवतात.”


अशा या लोकांच्या “लाडक्या” भाई गणपतराव देशमुख यांना दोन डझनांपेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. २०१७ मध्ये महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषद यांनी संयुक्तपणे गणपतराव देशमुख यांचा जीवनगौरव सन्मान केला होता. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटी या संस्थेनं त्यांना मानद डॉक्टरेट दिली आहे. व्यायामाची आवड असलेल्या आबांना अतिशय आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभलं. एज इज जस्ट अ नंबर हे त्यांच्या बाबतीत खरं होतं. एक्यान्नवाव्या वर्षी दिलेल्या मुलाखतीत ते आपल्याला अगदी साठीचे दिसतात. त्यांना मधुमेह किंवा रक्तदाब काहीच नव्हतं. आयुष्याच्या शेवटी त्यांची दृष्टी कमजोर होत गेली. मग ते आपल्या सहाय्याकडून वर्तमानपत्र वाचून घेऊ लागले. वयाच्या नव्वदीनंतर आबा म्हणायचे की “माझी दृष्टी चांगली असती तर मी जनतेशी संपर्क साधण्यासाठी आजची फेसबुक व्हाट्सअपसारखी समाजमाध्यमं शिकून घेतली असती.‌” 


नजर कमजोर झाली म्हणून २०१९ ची निवडणूक आबांनी लढवण्यास नकार दिला होता. ३० जुलै २०२१ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचं वृद्धापकाळामुळे निधन झालं. त्यांनी तेरा वेळा विधानसभा निवडणूक लढवली त्यापैकी अकरावेळा जिंकली, जो एक विक्रम आहे. विधानसभेत सर्वात जास्त काळ राहण्याचं त्यांचं रेकॉर्ड कोणी तोडेल असं वाटत नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून देवेंद्र फडणवीसपर्यंत (जोशी, राणे वगळता) सर्व मुख्यमंत्री त्यांनी पाहिले आहेत. दुसऱ्या पक्षावर टीका करताना त्यांनी कधीही आपली संस्कृती सोडली नाही. त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांची चांगले संबंध होते. म्हणून तर जेव्हा त्यांचा पुतळा उभारण्याचा कार्यक्रम होता, तेव्हा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला एका मंचावर पाहायला मिळाले. 


जात आणि धर्म यांच्या अनुषंगानं होणारे राजकारण पाहून आबा व्यथित होत असत. आबांच्या काळात सांगोल्यात वातावरण चांगलंच होतं. मात्र आता सांगोल्यातील राजकारण कलुषित झालं आहे. ऑक्टोबर २०२५ मधली गोष्ट. भाजपनं एक मोठा मेळावा घेतला होता, ज्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत इतर पक्षातील नेत्यांचं मोठं इन्कमिंग अर्थात पक्षप्रवेश झाला. या निमित्तानं एक रॅली काढण्यात आली होती. मात्र या रॅलीमधील काही माथेफिरू लोकांनी गणपतराव देशमुख यांच्या घरावर दगडं आणि दारूची बाटली फेकली.‌ सांगोला तालुक्यामध्ये या प्रकारचं राजकारण पहिल्यांदा झालं.‌ या प्रकरणात नंतर जरी भाजपानं, आणि स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेची निंदा केली असली तरी देखील द्वेषाचं जे राजकारण आपल्या अवतीभवती चालू आहे, त्यातूनच असे माथेफिरू घडत असतात.. असो..   


राजा कांदळकर यांनी जेव्हा आबासाहेबांना विचारलं होतं की आपण तुमचं आत्मचरित्र लिहू. तेव्हा आबा म्हणाले मी आयुष्यात एवढा मोठा काम केलं नाही की माझा आत्मचरित्र लिहावं. कांदळकर यांची इच्छा अखेर अपूर्ण राहिली. मात्र डॉ. किसनराव माने यांनी “राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख” हे चरित्र लिहून मोठं काम केलं. अशा माणसावर लिहायचं नाही तर कुणावर लिहायचं. अशी सॉल्लिड माणसं दुर्मिळ झाली आहेत. आबा म्हणायचे की “माझा हक्क नसलेली कोणतीही गोष्ट माझ्याकडे असेल, तर मला झोप लागणार नाही. हजारो कार्यकर्ते माझ्याकडे आदर्श म्हणून पाहणार असतील तर माझी नैतिक जबाबदारी अधिक वाढते.” ही नैतिकता जपली म्हणून जनतेनं त्यांना जपलं. पैसा आणि जात या दोन्ही गोष्टींचा वापर न करता कोणी व्यक्ती अकरा वेळा आमदार होऊ शकते, हीच खरंतर खूप मोठी नवलाईची गोष्ट आहे. जगावेगळ्या राजकारण्याची जगावेगळी गोष्ट!!




Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव : छोटा डॉक्टर बडा धमाका

गोमू आणि गोमाजीराव