हौसाबाई पाटील : संघर्ष.. संघर्ष.. संघर्ष!!!

 हौसाबाई पाटील : संघर्ष.. संघर्ष.. संघर्ष!!!



भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा विषय आला की काही मोजकी नावं आपल्याला आठवतात, त्यामध्ये काहींचं महत्त्वाचं योगदान असतं, तर काहींचं फारसं योगदान नसताना देखील त्यांना जास्त प्रसिद्धी मिळालेली असते. मात्र देशासाठी आपल्या सर्वस्वाची होळी केलेले हजारो क्रांतिकारक असतील, ज्यांची नावं कदाचित आपल्याला ठाऊक नसतील. कदाचित काहींची नावं ठाऊक असतील मात्र त्यांनी केलेलं काम, त्याग तपशीलवार माहीत नसेल. हौसाबाई पाटील हे असंच एक नाव. क्रांतिसिंह नाना पाटलांची मुलगी म्हणून काही जणांना त्यांचं नाव ठाऊक असतं, मात्र त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्ष आपल्याला ठाऊक नसतो. मुळात इथं “क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केलं होतं.” एवढी एकच ओळ शाळेमध्ये शिकवली जात असताना, पुण्यामुंबईत बसलेल्या पाठ्यपुस्तक निर्मिती समितीतील अभिजन मंडळींनी किसन वीर, जी. डी. बापू लाड, नागनाथ नायकवडी यांसारख्या क्रांतिकारकांची देखील उपेक्षा केलेली असताना क्रांतिसिंहाच्या मुलीबद्दल आपण वेगळी काय अपेक्षा करणार!! मात्र आज आपल्याला डॉ.‌ शोभा शिरढोणकर यांनी हौसाबाई पाटील यांच्यावर लिहिलेली चरित्रकादंबरी तसेच नात दमयंती पाटील यांनी शब्दबद्ध केलेलं हौसाताईंचं आत्मचरित्र यारूपानं एक मोठा ऐतिहासिक, अपरिचित घटनापट वाचण्यासाठी उपलब्ध आहे


क्रांतीसिंहाच्या छाव्यानं, हौसाबाईंनं भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासोबतच हैदराबाद मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आघाडीवर राहून नेतृत्व केलं होतं. चलेजाव आंदोलनामध्ये ब्रिटिशांशी जरी देशभर संघर्ष झाला असला, तरी सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये जे घडलं, ते अभूतपूर्व होतं. क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, उत्तम पाटील, जी डी बापू लाड यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश महासत्तेला आव्हान दिलं होतं. तब्बल ४४ महिने स्वतंत्र असलेल्या, कुंडल राजधानी असलेल्या या प्रतिसरकारची पायाभरणी करण्यामध्ये हौसाताई पाटील, इंदुमती पाटणकर, लीला पाटील, लक्ष्मी नायकवडी, विजयाताई लाड, राजमती पाटील अशा अनेक रणरागिणी सहभागी होत्या. जनतेच्या हितासाठी सत्तेसोबत संघर्ष करण्याची हौसाबाई यांनी लहानपणी घेतलेली भूमिका अगदी वयाच्या नव्वदीमध्येही टिकली. गोव्यातून बंदूक आणायच्या असतील, आपल्या सहकाऱ्यांना तुरुंगातून पळवून आणायचं असेल किंवा सरकारी डाकबंगले जाळायचे, लुटायचे असतील, सर्व प्रसंगांमध्ये हौसाबाई यांनी जबरदस्त धाडस आणि चातुर्य दाखवलं होतं.‌ त्यांचं आयुष्य एवढं नाट्यमय आहे की त्यावर अगदी तीन-चार भागांची सिनेमालिका बनू शकेल. 


क्रांतिसिंह नाना पाटील आणि आक्कुबाई यांची हौसा ही एकुलती एक कन्या.‌ तिच्या पाठीवर या जोडप्याला एक मुलगा झाला होता, मात्र तो तान्हा असतानाच गेला.‌ आक्कुबाईंच्या माहेरी, पलूस तालुक्यातील दुधोंडी गावात हौसाबाईंचा जन्म १२ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला. वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र हे नाना पाटलांचं मुळगाव, पिसाळ हे त्यांचं आडनाव काळाच्या ओघात मागं पडलं. हौसा तिच्या वडिलांना दादा म्हणायची. दादा लहान असतानाच त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ तर डोक्यामध्ये सत्यशोधक विचार पडले. त्यांनी सातवी पास करून नंतर कराड तालुक्यातील सुरली आणि वाठार या गावांमध्ये तलाठी म्हणून काम केलं.‌ जेव्हा त्यांचं लग्न झालं, तेव्हा आपल्या अशिक्षित बायकोला जोवर लिहिता वाचता येत नाही तोवर तिच्याशी पत्नी म्हणून संबंध ठेवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. आपल्या पत्नीला त्यांनी स्वतः शिकवलं आणि मग त्यांचा संसार सुरू झाला. सत्यशोधक समाजातील नेते भास्करराव जाधव यांच्या निवडणुकीमध्ये नाना पाटील यांनी प्रचार केला. सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांना प्रचार करण्यास मनाई होती. सरकारनं त्यांना ताकीद दिली की माफीनामा लिहून द्या नाहीतर नोकरी सोडावी लागेल. 


नाना पाटील हे माफीनामे लिहून देणार्‍यांपैकी नव्हते. त्यांनी नोकरी सोडली आणि हातामध्ये तिरंगा घेऊन स्वतःला देशकार्याला वाहून घेतलं.‌ “माझी वाट पाहू नका” असा निरोप देऊन दादा गेले ते तिकडेच.. सत्यशोधक विचार, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सावकारांच्या पाशात अडकू नका असं भोळ्याभाबड्या जनतेला सांगत नाना पाटलांनी पायाला भिंगरी बांधली होती. अडीच वर्षाची हौसा आणि तान्ह्या बाळाला घेऊन आता वाठारमध्ये राहण्यात काही हशील नव्हता. आक्कुबाई पुन्हा माहेरी आल्या.‌ मात्र काही दिवसातच तान्हं बाळ मरण पावलं‌, त्या दुःखामध्ये आक्कुबाईचं देखील निधन झालं.‌ तीन वर्षाच्या हौसाचं मातृछत्र हरपलं. तेव्हा वडील देखील भूमिगत झाले होते. ब्रिटिश त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना गुंगारा देत नाना पाटलांचं काम सुरू होतं. नाना पाटील हाती लागत नाहीत म्हणून ब्रिटिशांनी त्यांची शेती जप्त केली, वाडा जप्त केला आणि त्याला टाळं लावलं. नाना पाटलांच्या वाड्याचा आणि शेताचा लिलाव होणार होता‌. मात्र नाना पाटील करत असलेलं काम सर्वांना माहीत होतं त्यामुळे लिलावामध्ये बोली लावण्यासाठी कोणीच पुढं आलं नाही. रोज दवंडी पिटली जायची मात्र लिलावाला कुणी आलंच नाही. 


अंगावरच्या कपड्यानिशी राहता वाडा सोडावा लागला. त्यामुळे लहानग्या हौसाला सांभाळणाऱ्या आजीपुढं, गोजराबाईंपुढं समस्यांचा डोंगर उभा राहिला होता.‌ मोठा वाडा सोडून आता दोन खोल्यांमध्ये राहावं लागत होतं, मात्र गोजराबाई हे अतिशय भक्कम व्यक्तिमत्व. त्यांच्यावर देखील सत्यशोधक विचारांचे, सानेगुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संस्कार झालेले. या आव्हानांना त्या पुरुन उरल्या. एकदा गोजराबाईंच्या चोळ्या फाटल्या होत्या. नवी चोळी विकत घेण्याइतपत पैसा नव्हता. शेवटी त्यांनी नाना पाटलांची जुनी लुंगी शोधून काढली आणि त्या पांढऱ्या लुंगीच्या दोन चोळ्या शिवल्या. शिवाय आपल्या सहा वर्षाच्या नातीसमोर त्यांनी शपथ देखील घेतली की जोपर्यंत ब्रिटिश भारत सोडून जात नाहीत तोवर मी फक्त पांढऱ्या चोळ्या वापरेल.‌ ही शपथ त्यांनी काटेकोरपणे पाळली. अशा खमक्या आजीच्या संगोपनात हौसा तयार होत होती. गंगू आत्यासोबत हौसादेखील काम करू लागली होती, कुटुंबाला हातभार लावू लागली होती.‌ 


हौसा मोठी होत होती, तेव्हा नाना पाटलांची मुलगी म्हणून लोक तिच्याकडं कौतुकानं पाहायचे. दादा काय काम करतायेत हे नीट समजत नसलं तरी ते नक्कीच खूप मोठी व्यक्ती आहे हे हौसाला लक्षात आलं होतं. एकदा गाडगेबाबा त्यांच्या घरी आले आणि तिला म्हणाले की, “राम, कृष्ण, शिवाजी यांची नावं जशी जगाला माहिती आहेत, तसंच नाना पाटलांचं नाव देखील एक दिवस मोठं होईल.” दादा कधी मुक्कामी घरी आले तर हौसाला त्यांच्याशी किती बोलू आणि किती नाही असं व्हायचं. दादा देखील तिला शक्य त्या कार्यक्रमांमध्ये सोबत घेऊन जायचे. “वाघीण आहे माझी मुलगी!” असं ते सगळ्यांना सांगायचे, तेव्हा हौसाला मुठभर मांस चढायचं. दादा हौसाशी बोलताना देखील अहो जाहो बोलायचे, त्यांना ताई म्हणायचे. “ताई उठलात का, तुम्हालाही आता लवकर उठायची सवय लावून घ्यायला हवी. कुठंही आणि कसंही राहता यायला हवं.” असं दादा त्यांना सांगायचे. हळूहळू हौसाकडे काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या. भूमिगत कार्यकर्त्यांना केसाच्या अंबाड्यात लपवून चिठ्ठ्या पोहोचवणं किंवा डबे पोहोचवणं अशी कामं हौसा सफाईनं करू लागली.


नाना पाटलांची छोटी बहीण गंगुबाई हिचं लग्न नाथाजी लाड या कार्यकर्त्यासोबत ठरलं. कुंडल गावामध्ये हे लग्न गांधी पद्धतीनं होणार होतं. गांधी लग्न म्हणजे अतिशय साध्या पद्धतीनं, कमी खर्चात केलेलं लग्न. नवरानवरीनं एकमेकांना सुताचा हार घालून लग्न करणे आणि जमलेल्या सर्वांनी घरून आणलेली भाजी भाकरी खाणं. मंगलाष्टकांऐवजी क्रांतीचे गीत म्हणणं, भारतमाता की जय गांधीबाबा की जय या घोषणा देऊन हे लग्न पार पाडायचं. कोणतेही कर्मकांड नाही, की खर्च नाही. आत्याचं लग्न झाल्यानंतर हौसा एकटी पडली. पण लवकरच तिला राष्ट्रसेवा दलाच्या रूपानं अनेक सवंगडी मिळाले. राष्ट्रभक्तीची गाणी ती गाऊ लागली, प्रभातफेरी काढू लागली, ग्रामस्वच्छता करू लागली, शिबिरं आयोजित करू लागली. पंचक्रोशीमध्ये फिरून सेवादलाच्या नवीन शाखा काढू लागली. दादा करत असलेल्या सावकारी विरुद्धची मोहिम, अंधश्रद्धा निर्मूलन यासारखे विषय घेऊन गावोगाव फिरू लागली. लोकांना शिक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांसोबत देखील हौसा भरपूर फिरली आहे. 


दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि सह्याद्रीमध्ये चळवळीचा वेग वाढला. इतर मुलांसोबत हौसादेखील लष्करी शिक्षण घेत होती, ती देखील बंदूक चालवायला शिकली. त्यामुळे तिची प्रसिद्धी अधिकच वाढली. नाना पाटलांचे चळवळीतील सहकारी असलेल्या नानासाहेब मोरे यांनी आपला मुलगा भगवानराव यासाठी हौसाला मागणी घातली. हौसाक्का तेरा वर्षाची झाली असली तरी अंगापिंडानं मजबूत असल्यामुळे ती अधिकच मोठी दिसायची. कडेगाव तालुक्यातील हणमंतवडिये गावात राहणाऱ्या भगवानराव मोरे यांचं स्थळ खूप चांगलं होतं. माणसं आर्थिक आणि वैचारिक दोन्ही पातळीवर श्रीमंत होती. नाना पाटील म्हणाले की “मी लग्नामध्ये काहीच खर्च करणार नाही. तुमच्याकडूनच नारळ घेणार आणि नवरदेवाच्या हातात देणार.‌” मोरेंना अर्थातच ही गोष्ट मान्य होती. आजवर गरिबीमध्ये जगलेल्या हौसाक्काला आता श्रीमंत घर मिळणार होतं. मात्र तिनं अट घातली की तिला लग्नानंतर देखील चळवळीचं काम करता आलं पाहिजे. ही अट देखील मान्य होणार होती. तिचं लग्नदेखील गांधी पद्धतीनं झालं. सुताचे हार आणि क्रांतीचं गीत..‌बस!! नाना पाटील यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीच्या मुलीचं तसंच नानासाहेब मोरे यांच्यासारख्या मातब्बर घरातील मुलाचं लग्न एवढ्या साध्या पद्धतीनं झालेलं लग्न हे समाजासाठी आदर्श उदाहरण होतं. 


लग्नानंतर देखील हौसाक्का सेवादल तसेच रयत शिक्षण संस्था यांच्या प्रचारासाठी गावोगावी फिरत होती.‌ आता भगवानराव देखील तिच्यासोबत असायचे. खेडेगावच्या दलित बायकांना नवल वाटायचं की ही पाटलाची पोरगी असून देखील आपल्या घरचं पाणी पिते. हौसाक्काला तिच्या आजीनं समता, मानवता हे संस्कार दिले होते.‌ जातीभेद पाळत नसल्यामुळे ती खेड्यातील सर्व जातीतील स्त्रियांशी जोडली जायची आणि त्यामुळे जेव्हा ती मुलांना सेवादलात, शाळेत पाठवण्यासाठी आवाहन करायची, त्यावेळेस चांगला प्रतिसाद मिळायचा.‌ एक दिवस अशीच भ्रमंती सुरू असताना हौसाक्कांना धूर येताना दिसला. धुराच्या दिशेनं जाताना वास देखील येऊ लागला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं कुणीतरी दारूची भट्टी लावली आहे. सोबतचे कार्यकर्ते म्हणाले की, “दारूची भट्टी लावणारी लोकं गुंड असतात, आपण जवळ जायला नको.” हौसाक्कानं पाहिलं की तिथं पाच सहा माणसं आहेत. त्या माणसांनी देखील धमकी दिली की, “आमचा मालक खूप मोठा गुंड आहे, त्याच्या नादी लागू नका.‌” हौसाक्कांनी जवळ जाऊन सर्व भांडी पालथी केली, सर्व दारू ओतून दिली. जा बोलव तुमच्या मालकाला असं म्हणत हौसाक्का तिथंच बसून राहिली. भगवानराव आणि इतर सर्व कार्यकर्ते तिचा आवेश पाहून थक्क होऊन गेले होते. 


१९४२ मध्ये देशभर चलेजाव आंदोलन सुरू झालं. आझाद हिंद सेनेच्या बातम्या एव्हाना येऊ लागल्या होत्या. आपणही तयार असलं पाहिजे असं नाना पाटलांना वाटत होतं. तुफान सेनेच्या सैनिकांना लष्करी प्रशिक्षण सुरू झालं. हौसाक्कानं पुढाकार घेऊन हणमंतवडिये इथं देखील गुप्त लष्करी प्रशिक्षण सुरू केलं, ज्यामध्ये रामोशी आणि धनगरांची मुलं सहभागी झाली. महिलांची वेगळी फलटण निर्माण करण्याची तयारी हौसाक्कांनी दर्शवली. आंदोलनानं वेग पकडला तेव्हा भगवानरावांना भूमिगत व्हावं लागलं. हौसाक्कांच्या दोन्ही दिरांना तसेच सासऱ्यांना अटक झाली.‌ हौसाक्कांच्या घरातील चारही पुरुष अटक नाही तर भूमिगत होते. ब्रिटिशांना चलेजाव असं ठणकावत गावामध्ये निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व हौसाक्कांनी स्वतः केलं. राज्यभर मोर्चे निघू लागले. वडूजमध्ये निघालेल्या मोर्चावर सरकारनं केलेल्या गोळीबारात आठ देशभक्त ठार झाले. इतर ठिकाणावरून देखील अशाच बातम्या येऊ लागल्या.‌ कार्यकर्ते देखील पेटून उठले. रेल्वेचे रूळ, टेलिफोनच्या वायर्स उखडणे सुरू झाले. 


भूमिगत कार्यकर्त्यांचं काम आणि संख्या वाढू लागली.‌ बंदुकांची गरज भासत होती. गोव्यामधून बंदूका मिळू शकत होत्या, मात्र आणायला कोणी जायचं. हौसाक्कांनी गोव्याला स्वतः जायचं ठरवलं. पणजीपासून दूर गर्द जंगलामध्ये त्यांना बंदुका देण्यात आल्या. पोलिसांची नजर चुकवून एवढ्या बंदूका न्यायच्या कशा हा प्रश्न होताच. त्यांनी सर्व बंदूका एका साडीमध्ये गुंडाळल्या आणि तिचं गठुडं बनलं. तिथलीच एक मळकी पिशवी घेतली, त्यात हे गठुडं ठेवलं. बंदुकीचे ओझं डोक्यावर घेऊन हौसाक्का जंगलाच्या वाटेनं पायी निघाल्या.‌ पुढे जंगलात त्यांना जी डी बापू भेटले. किर्र जंगलामधून दोघंजण रात्रभर तंगडतोड करत बांद्यामध्ये उतरले. गोवा पोलिसांचं भय आता नव्हतं. दुसऱ्या दिवशी दिवसभर तंगडतोड करत जंगलाच्याच मार्गानं त्यांनी बेळगाव गाठलं‌. तिथून मिरजेपर्यंत रेल्वेनं यायचं होतं. बापू वेगळ्या डब्यात आणि हौसाक्का वेगळ्या डब्यात बसल्या. हौसाक्का कडे असलेल्या गाठोड्याची पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी कपडे आहेत, माहेरी चालली आहे असं सांगून त्यांनी वेळ मारून नेली. कराडला आपल्या कार्यकर्त्यांच्या हातात सर्व बंदूका सुखरूप पोहोचवल्या. तुफान सेनेला आता शस्त्रांचं बळ मिळालं होतं. 


२६ एप्रिल १९४३ रोजी कुंडल बँकेवर धाड घालून चळवळीसाठी निधी मिळवण्यात आला‌. ७ जून १९४३ रोजी शेणोली येथे ब्रिटिश सरकारच्या पगाराची रक्कम घेऊन जाणारी रेल्वे लुटण्यात आली. अनेक ठिकाणी पोस्टाच्या गाड्या लुटून मनीऑर्डरचे पैसे लुटण्यात आले. ३ ऑगस्ट १९४३ रोजी पणुंब्रे इथं प्रतिसरकारची स्थापना झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांसारखी पुढं महत्वाची पदं भूषवणारी मंडळीदेखील प्रतिसरकार आंदोलनामध्ये होती. प्रतिसरकारचे प्रमुख प्रेरक नाना पाटील हे ब्रिटिशांसाठी मोस्ट वॉन्टेड झाले होते. मात्र त्यांनी जंगजंग पछाडून देखील नाना पाटील त्यांच्या हाती लागत नव्हते. नाना पाटलांच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवण्यात आली. एकदा गंगूबाई आणि हौसाबाई नाना पाटलांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. येडेमच्छिंद्र जवळ तुफानी सेनेचा शपथविधी कार्यक्रम होणार होता. गावापासून थोडं पुढं गेल्यानंतर हौसाबाईंच्या लक्षात आलं की एक माणूस सायकलवर आपल्या बैलगाडीचा पाठलाग करतोय. हौसाबाईंनी बैलगाडी थांबवली तर तो लगेच लपला. हौसाबाईंनी मग मुद्दाम मार्ग बदलला आणि त्या माणसाला खोपच्यात पकडला. त्याच्या पाठीवर एक रगाडा दिला तर तो भुईसपाट झाला. खूप गयावया करून त्यानं स्वतःची सुटका करून घेतली. गंगुबाईंनी हौसाबाईंचा हा चंडीकाअवतार पहिल्यांदाच पाहिला. गाडीवानाला तर असं वाटलं होतं की तो सायकलवाला आता मरतोय.

 

त्यादिवशी पाच हजारपेक्षा जास्त तरुणांनी तुफानी सेनेची शपथ घेतली. गंगुबाई कदम, माई सूर्यवंशी, गंगुबाई पवार अश्या अनेक महिला तुफानी सेनेमध्ये सहभागी झाल्या होत्या. विटा गावातील तारा तोडण्यामध्ये या सर्वांनी मदत केली होती. ज्यांना प्रत्यक्ष काम करता आलं नाही, त्या महिला सैनिकांना लपवण्यासाठी मदत करायच्या. प्रतिसरकारचा समाजावर इतका प्रभाव होता की महिला जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणायच्या...

गांधी माझा सखा गं, ओवी त्याला गाईनं,

तुरुंगात जाऊनिया स्वराज मिळविनं

नाना माझा भाऊ गं, ओवी त्याला गाऊया,

त्याच्यासंगे लढता लढता स्वराज्य मिळवूया.

कस्तुर माझी माता ग, वंदिन तिजला आता ग

सुभाष माझा भ्राता त्याच्या चरणी ठेवीन माथा ग

नाना पाटील नाही एकला प्रांत सातारा दिमतीला

घरोघरीचे शूर शिपाई आहेत त्यांच्या मदतीला


गावातील तुफानी सेनेच्या कार्यकर्त्यांना हौसाबाई मार्गदर्शन करायच्या. गावात कोण दारू पितो याची यादी तयार करायला सांगितली जायची. दारू पिणाऱ्या व्यक्तीला आधी समजावून आणि नंतर धमकावून, शिक्षा देऊन दारूपासून लांब ठेवले जायचं. हौसाबाई म्हणायच्या की लग्न कमीतकमी खर्चामध्ये करा, लग्नासाठी कर्ज काढू नका. हुंडा देऊघेऊ नका. गांधी पद्धतीनं लग्न करा. यावर तरुण म्हणायचे की “घरचे म्हणतात की देवाब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न केलं, तरच सुख मिळतं.” यावर हौसाबाई म्हणायच्या की, “मी नाही का सुखी झाली.‌ तुमच्या घरच्यांना सांगून एका दिवसामध्ये कळणार नाही. घरातील स्त्रियांना तुफानी सेनेमध्ये घेऊन या.” ऑक्टोबर १९४३ मध्ये वांगीचा डाकबंगला जाळला या मोहिमेची रेकी हौसाबाईंनी केली होती. ते देखील ओली बाळंतीण असताना! मुलाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी!! स्मशानभूमीतील पेटत्या चितेची उब घेत पोलिसांच्या या ठाण्याची त्यांनी रेकी केली. कृष्णा साळुंके उर्फ शेलारमामा यांच्यासोबत ही मोहीम फत्ते केली गेली. तिथं उपस्थित असलेल्या पंधरा सोळा पोलिसांना सुगावा लागू न देता खबऱ्यांमार्फत योग्य माहिती भूमिगतांना पोहोचवली आणि दुसऱ्या दिवशीच तुफानसेनेनं हा डाकबंगला लुटला आणि जाळून टाकला. 


भवानीनगर पोलीस ठाण्यातून दिवसाढवळ्या शस्त्रं पळवून नेणं हा तर सर्वात थरारक आणि विनोदी प्रसंग आहे. पोलीस ठाण्यासमोर एक म्हातारा आपल्या सुनेला झोडू लागला. आसपास लोक जमा झाले आणि काही पोलीस देखील आले. सासरा झालेले शेलारमामा शिव्या देत होते, मारहाण करत होते आणि सुन झालेल्या हौसाबाई मोठमोठ्यानं ओरडत होत्या. खेळ अगदी रंगात आला आणि सासऱ्यानं सुनेच्या डोक्यात घालण्यासाठी एक मोठा दगड उचलला. सुनेसोबत लोकदेखील ओरडू लागले की वाचवा वाचवा.. पोलीस ठाण्यातील उरलेले पोलीस देखील बाहेर आले. सुनेनं एक वेगळा टाहो फोडत तिच्या सहकाऱ्यांना सिग्नल दिला आणि पाच मिनिटांमध्ये, कोणाला कळायच्या आत पोलीस ठाण्यामधील सर्व बंदुका गायब झाल्या. या प्रसंगात पोलीस एवढे रंगले होते, की एका पोलिसानं या सासरा सुनेचं तिकीट काढून त्यांना गाडीत बसवून दिलं. बंदुका काडतुसं गायब झाल्याचं समजेपर्यंत सर्व क्रांतिकारक गायब झाले होते. सासरा आणि सुनेवर कुणी संशय देखील घेतला नाही. 


अगदी सिनेमॅटिक प्रसंग वाटतो ना, पुढचा प्रसंग अधिक सिनेमॅटिक आहे. पोर्तुगीजांच्या कैदेत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना सोडवून आणणे हा हौसाबाईंच्या जीवनातील सर्वात रंजक प्रसंग म्हणावा लागेल. बाळ जोशी नावाचा क्रांतिकारक तुफान सेनेला बंदुका पुरवायचा.‌ एकदा त्याच्या मागं पोर्तुगीज पोलीस लागले असताना त्यानं बंदूका लपवून ठेवल्या. मात्र तो आणि माने हा त्याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागला. नाना पाटलांनी बैठक घेतली आणि प्लॅन तयार केला. हौसाबाईंसारखी हुशार व्यक्ती यासाठी हवी होती. मात्र नेमकं त्यावेळी हौसाबाईंचं चार महिन्याचं बाळ आजारी होते. त्यांनी मोहिमेला जायला नकार दिला. कार्यकर्त्यांनी ही गोष्ट नाना पाटलांच्या कानावर घातली. त्यावर नाना पाटील म्हणाले, “मी तिला जा म्हणार नाही आणि थांब देखील म्हणणार नाही. मात्र माझी मुलगी म्हणून तिनं बाप करत असलेल्या कार्याला शोभेल असं वागावंं.” दादांनी इरेला टाकल्यावर हौसाबाई त्यांचा शब्द पडून देणं शक्यच नव्हतं.‌ नानासाहेब मोरे देखील म्हणाले, “बाळाची काळजी आम्ही करू. तु फक्त तुझी काळजी घे.‌ मोहीम फत्ते करून ये.” हौसाबाईंनी मोहिमेची तयारी सुरू केली.‌ जी डी बापू आणि हौसाबाई गोव्यामध्ये पोचले.‌


हौसाबाईंनी बाळ जोशीची बहिण बनून त्याची तीन वेळा भेट घेतली. या भेटींवर पोलिसांची करडी नजर असायची तरीदेखील त्यांची नजर चुकवून हौसाबाईंनी पहिल्या भेटीत निरोप पोचवला की लवकरच तुला सोडवणार आहोत. अंबाड्यात लपवलेला प्लॅनचा कागद त्याला देण्यात आला. दुसऱ्या भेटीमध्ये लोखंडी आकडी आणि कानस देखील बाळ जोशीपर्यंत पोहोचवली गेली. त्यांचा वापर करून त्यानं गज कमकुवत करून ठेवले. तिसऱ्या भेटीमध्ये प्रत्यक्ष गजाबाहेर येऊन बाळ जोशी हौसाबाईंसोबत तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून पलीकडे पळून गेला होता. मानेदेखील पळून गेला. पळून गेल्यानंतर बाळ जोशीनं जंगलात लपवलेल्या बंदुका देखील ताब्यात घेतल्या. हौसाबाईंनी इतर क्रांतिकारकांसोबत रात्रीच्या अंधारात मांडवी नदीची खाडी पोहून पार केली. प्रचंड पायपीट करत पंधरा दिवसांमध्ये त्यांनी घर गाठलं. नाना पाटलांना एवढा आनंद झाला की त्यांनी हौसाबाईंना कडकडून मिठी मारली. घरातील जावांनी हौसाबाईंची दुष्ट काढली.‌ हौसाबाईंची चारही मुलं या जावांनीच मोठी केली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण देश स्वतंत्र झाला तरीसुद्धा हौसाबाईंचा संघर्ष थांबला नव्हता.‌


स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्ता हाकलून देणं नव्हतं. गरीब, शेतकरी, कामगार आणि वंचित माणसाला सन्मानाचे जीवन मिळणे हेही त्या स्वातंत्र्याचे उद्दिष्ट होतं.

हौसाबाई आणि भगवानराव शेतकरी कामगार पक्षाशी जोडले गेले. त्या काळात मराठवाडा पेटला होता, रझाकारांचा धुमाकूळ चालू होता.‌ हौसाबाई म्हणाल्या की आपण केवळ पेपरमध्ये आयाबहिणींवर झालेल्या बलात्कारांच्या बातम्याच वाचायच्या का.. आपण रझाकारांना उत्तर दिलं पाहिजे. हौसाबाई आणि भगवानराव मराठवाड्यात दाखल झाले. हौसाबाईंनी महिलांना संघटित करायला सुरुवात केली. एकदा अशीच त्यांची सभा सुरू असताना काही रझाकार गावावर चालून आले‌. हौसाबाई म्हणाल्या “अजिबात घाबरायचं नाही.. ही आठ दहा लोक आपल्याला काही करू शकत नाहीत. प्रत्येकाने एक एक दगड मारला तरी ही माकडं पळून जातील.” आणि अगदी तसंच झालं.‌ गावानं प्रतिकार केला आणि रझाकार पळून गेले. अशी अनेक गावं प्रतिकार करू लागली. निजामाच्या तावडीतून आणि रझाकारांच्या हिंसाचारातून मराठवाडा स्वतंत्र झाला.‌


गोवा मुक्ती संग्रामामध्ये देखील हौसाबाईंचं योगदान महत्त्वाचं आहे. निवडलेल्या सत्याग्रहींच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव होतं. तिथं एक पोर्तुगीज पोलीस सभा उधळण्यासाठी आला. तेव्हा भाषण करत असलेल्या हौसाबाईंनी त्याच्या दिशेनं पिस्तुलाचा एक बार केला. पोलीस तिथून पळून गेला, मात्र हौसाबाईंना भूमिगत व्हावं लागलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये तर हौसाबाईंसोबत त्यांची ८० वर्षाची आजी देखील होती. गोजराबाईंनी घोषणा देत मोरारजी देसाईची चांगलीच उतरवून ठेवली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी दिल्लीत संसदेपुढे निदर्शने करण्यात गोजराबाई आघाडीवर होत्या. हौसाबाईंनी महिलांना सांगून ठेवलं होतं की जर आपल्याला पोलिसांनी उचललं आणि कुठल्या अज्ञातस्थळी सोडायला लागले तर गाडीतून खाली उतरायचं नाही. त्यांना सांगायचं एकतर पोलीस स्टेशनला उतरणार किंवा न्यायालयामध्ये! पोलिसांनी खरंच त्यांना एका अज्ञातस्थळी उतरण्यास सांगितलं, तेव्हा उतरण्यास ठाम नकार देत हौसाबाई म्हणाल्या, “तू आम्हाला हात लावून दाखव, मग तुला आम्ही आमचा मराठी हिसका दाखवते.”


क्रांतिसिंह नाना पाटलांप्रमाणे हौसाबाईंचं देखील वागणं रोखठोक. दोघांना राजकारण जमलं नाही. नाना पाटलांना निवडणुकीमध्ये साताऱ्यामध्ये तिकीट नाकारत यशवंतराव चव्हाण यांनी स्वतःची स्पर्धा कमी केली. मात्र त्यामुळे काँग्रेसवाल्यांना गावबंदीचा सामना करावा लागला. नाना पाटील बीडमधून निवडून येऊन खासदार झाले. सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या सोयीचं राजकारण करणे नाना पाटलांना जमलं नाही आणि हौसाबाईंना देखील. म्हणून तर पंडित नेहरू यांच्या प्रतापगड दौऱ्यामध्ये त्यांचा निषेध करण्यासाठी केलेल्या निदर्शनांमध्ये हौसाबाई आघाडीवर होत्या. "गोरं घालविलं अन काळं आणलं... आमचं चुकलंच जरा! खुर्च्याच जाळायला पाहिजे होत्या त्या, मग खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं असतं.” असं त्या म्हणत. रानावनातून हिंडत, आयुष्यातील अनेक वर्षं भूमिगत राहून प्रतिसरकारनं स्वातंत्र्य मिळवलं. पण खरंच लोक स्वतंत्र झाले का? असा थेट प्रश्न हौसाबाई विचारत असत. 


वय वाढत गेलं तरीदेखील त्यांची संघर्षाची धार मात्र कायम राहिली. पाणी, शेतकरी आणि कष्टकरी यांच्या प्रश्नांसाठी लोकशाही पद्धतीनं त्या आंदोलन करत राहिल्या. शस्त्राऐवजी सत्याग्रह, भूमिगत मोहिमांऐवजी धरणे हाच काय तो बदल झाला होता. त्यांना आयुष्यभर आधार देणारे वडील आणि पती या दोघांचं मधल्या दशकांमध्ये निधन झालं. मात्र आपली सामाजिक बांधिलकी जपत हौसाबाई लढत राहिल्या. २००३ मधील आंदोलनाची गोष्ट आहे. दुष्काळी भागाला मदत करावी म्हणून आंदोलन सुरू होतं ज्यामध्ये आपला मुलगा सुभाष याला घेऊन हौसाबाई आघाडीवर होत्या. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा अजित खूप आजारी होता. १२ मार्च पासून सुरू झालेलं हे आंदोलन तब्बल १०१ दिवस चाललं. २४ मे रोजी निरोप आला की अजितचं निधन झालं. हौसाबाई अंत्यविधीसाठी उपस्थित राहिल्या, आपल्या लेकाला शेवटची मिठी मारली. मात्र अंत्यविधी झाल्यानंतर त्या पुन्हा आंदोलनात सहभागी झाल्या. नंतर लढाई यशस्वी करूनच त्या घरी परतल्या. 


२००४ मध्ये सरकारनं खानापूरच्या दुष्काळी भागासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे ठरवलं होतं. मात्र ऐनवेळी हे पाणी इतर तालुक्यांना वळवण्यात आलं. त्यावेळी ७८ वर्षाची ही वीरांगना देवराष्ट्राच्या माळावर ठिय्या देऊन पाणी संघर्ष आंदोलन करण्यास बसली. हा लढा देखील यशस्वी झाला. २०१० मध्ये सांगलीमध्ये विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं, त्याचे उद्घाटक म्हणून हौसाबाईंना बोलवण्यात आलं होतं. २०१४ मध्ये ऊसाला भाव मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी कडेगाव तहसील कार्यासमोर उपोषण केलं होतं. खर्डा भाकर आंदोलन करून काळी दिवाळी साजरी केली होती. अशा या संघर्षमूर्तीचं २३ सप्टेंबर २०२१ रोजी, कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं. त्यांच्यावर हणमंतवडिये गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले..‌


भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगताना अनेकदा मोठ्या नेत्यांच्या राजकीय निर्णयांवर भर दिला जातो. पण स्वातंत्र्यलढा गावागावांत पोहोचवणारे असंख्य सामान्य कार्यकर्ते या इतिहासाच्या मुळाशी होते. त्यांच्या स्वप्नातील भारत हा अतिशय वेगळा होता. शेठजी भटजी लाटजी यांच्यापासून मुक्त असलेलं जनतेचं राज्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या.‌ मात्र त्यांच्या पदरी निराशा आली असेल. राजकारणाचे बदललेले संदर्भ पाहून तेव्हा नव्वदीमध्ये असलेल्या हौसाबाई म्हणाल्या होत्या, "माझं वडील क्रांतीसिंह नाना पाटील जिवंत असतं तर त्यांनी तीन दिवसापेक्षा जास्त दिवस हे सरकार ठिवलं नसतं, कधीच त्याला बाजार दाखवला असता.” आज असं दुसरं कोणी बोललं तर त्याला लगेच दिमागी नक्षल ठेवण्यात येईल..‌ पाकिस्तानात जा असा आदेश काढतील.‌ हौसाबाई या छाव्याचा दरारा असावा, म्हणून त्यांना कोणी काही बोललं नाही. हा दरारा त्यांनी आयुष्यभर संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करून मिळवला होता.‌ 

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव : छोटा डॉक्टर बडा धमाका

गोमू आणि गोमाजीराव